शहर-ग्रामीण भाजप पदाधिकार्‍यांची ’दो गज की दूरी’

Foto
कोरोनाला हरवायचे असेल तर सोशल डिस्टंसिंग अर्थात दो गज की दूरी’ आवश्यक असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला आज भाजप कार्यकर्त्यांनी तंतोतंत पाळला. शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळा हर्सूल परिसरात जमला तरी पदाधिकार्‍यांनी मात्र दो गज की दुरी चेच अंतर राखल्याने खमंग चर्चा होत आहे.
तब्बल आठ महिने रखडलेल्या शहर जिल्हा पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या भाजपने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. नेत्यांमधील रस्सीखेच, कार्यकर्त्यांची चढाओढ यामुळे या नियुक्त्या तशा चांगल्याच गाजल्या. महत्प्रयासाने अखेर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. तरीही वाद उफाळून आलाच. शहराध्यक्षांनी पत्रकार परिषद न घेता सोशल मीडिया वरून नियुक्त्या जाहीर केल्या. तर खा. डॉ. भागवत कराड आणि अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांसमोर नियुक्त्या जाहीर केल्या. दुसरीकडे ग्रामीण भागातील नियुक्त्यांमध्ये माजी विधानसभा अध्यक्षांच्या समर्थकांना डावलल्याची मोठी चर्चा आहे. या परिस्थितीत आता पक्षांतर्गत ताळमेळ कसा बसेल याची चिंता नेतेमंडळींना लागल्याचे दिसते.  
शहर - ग्रामीण पदाधिकारी एकाच मंडळात!
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज हर्सूल परिसरातील एका मंगल कार्यालयात ग्रामीण पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश सदस्य इद्रीस मुलतानी, जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ होत आहे. दुसरीकडे आज सकाळपासून शहर अध्यक्षांसह प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर आदी नेते मंडळी हर्सूल परिसरात वार्ड परिक्रमा करीत आहे. सकाळपासूनच पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू आहे. याच परिसरात तर अवघ्या अर्धा किलोमीटरवर ग्रामीण पदाधिकार्‍यांचा मेळावा आणि सत्कार समारंभ होत आहे. मात्र तरीही दोन्ही कार्यक्रमांची सरमिसळ न करता पक्षाच्या आदेशानुसार शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांनी दो गज की दूरी चेच अंतर राखून आदर्श निर्माण केला. 
शहर पदाधिकार्‍यांचा सत्कार 17 सप्टेंबरला? 
ग्रामीण कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांचा सत्कार आज केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होत आहे. आता शहर कार्यकारिणीचा सत्कार समारंभ 17 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते शिरीष  बोराळकर यांनी दिली. सदर कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.